स्वयंअभ्यासाची संस्कृती घडवणारे वरळीतील SVS इंग्लिश स्कूल - इतर शाळांसाठी प्रेरणास्थान
- Prof. Mahesh Mali
- May 15
- 2 min read
मुंबई : वरळीतील SVS इंग्लिश स्कूल यांनी शिक्षण क्षेत्रात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसमोर नवी दृष्टी उभी केली आहे. मुलांनी कोणत्याही कोचिंग क्लासवर अवलंबून न राहता, शालेय शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली व स्वअभ्यासाच्या जोरावर उत्कृष्ट यश मिळवून दाखवले आहे. इतर शाळांनी देखील या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा पालक आणि शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअभ्यासाची प्रेरणा जाग्रुत करण्यासाठी - SVS इंग्लिश स्कूलचे विश्वस्त व संचालक श्री. देवदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी खासगी शिकवण्या टाळून, शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यास करावा, असा शाळेचा मनोदय होता. यासाठी शाळेने शहरातील नामांकित डॉक्टर्स, इंजिनीअर्स, लेखक आणि प्राध्यापकांना आमंत्रित करून अतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्या मोफत उपलब्ध करून दिल्या. दररोज नियमित शालेय तासांव्यतिरिक्त २ तास विशेष मार्गदर्शन तास आणि १ तास सराव सत्र वर्षभर घेण्यात आले. शाळेचे स्वतःचे शिक्षक आणि बाहेरून बोलावलेले विषयतज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले. हे सर्व मोफत सेवा म्हणून राबवण्यात आले, यामुळे पालकांची लाखो रुपयांची शिकवणी फी वाचली आहे.

पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने एकत्र येऊन (सहकारी शिक्षण विकास समुह संस्था) ही योजना यशस्वी करण्यावर भर दिला. शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांना खासगी शिकवण्यांकडे जाण्यापासून परावृत्त केले आणि पालकांनीही शाळेच्या या धोरणाला भरभरून प्रतिसाद दिला. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांनी स्व कर्तृत्वावर ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून दाखवले आहेत. विद्यार्थ्यांचे स्वअभ्यासाचे कौशल्य विकसित झाले असून त्यांचा आत्मविश्वास आता वाढला आहे.

SVS इंग्लिश स्कूलने दिलेल्या या धड्यामुळे इतर शाळांनाही प्रेरणा घ्यायला हवी. आजच्या काळात खासगी शिकवण्यांचा दर्जा अनेकदा कमी असतो आणि फक्त व्यवसायिक दृष्टिकोनातून त्याचा प्रचार केला जातो. त्यामुळे अशा शाळा ज्या विद्यार्थ्यांना शाळेच्या ठिकाणीच दर्जेदार मार्गदर्शन देतात, त्या समाजासाठी आदर्श ठरतात.
SVS इंग्लिश स्कूलचा हा अभिनव उपक्रम इतर शाळांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. शिक्षण ही फक्त शिकवण्याची प्रक्रिया नसून, विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रवृत्त करणे ही खरी गुरुकिल्ली आहे, हे या शाळेने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
शाळा, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन या सगळ्यांनी एकत्र येऊन जर असा उपक्रम राबवला तर संपूर्ण शिक्षणक्षेत्रात एक सकारात्मक बदल घडू शकतो.
---
लेखक : डॉ. प्रा. महेश माळी
Ph.D. (Engg), M.E. (Comp), B.E. (IT)
स्रोत : SVS इंग्लिश स्कूल, वरळी (मुंबई)
---
Comments